मुंबई - धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला जी मते मिळाली, ती त्यांची मते नव्हती. त्यांनी केवळ इतरांच्या घरात चोऱ्या करून मते फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपावर केला. विधान भवनात आज काँग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला कमी मते का मिळाली, या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपाने इतरांच्या घरात चोऱ्या करून जी संपत्ती मिळवली आहे. ती त्यांची नव्हती. त्यांनी ती इतरांच्या घरात चोऱ्या करून ती मिळवली. त्यामुळे भाजपाने इतरांची मते फोडणे हे काही जुने नाही.
सर्वोच्च न्यायालयात जे विधी तज्ञ मराठा आरक्षणाच्या संदर्भात बाजू मांडत आहेत. आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला. याबाबत आम्ही त्यांची मते आणि सल्ले घेत आहोत. त्यांचा सल्ला घेतल्यानंतरच आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुढील पाऊल टाकणार आहोत. कालच्या बैठकीनंतर आम्ही विधी तज्ञ आणि या क्षेत्रातील इतर तज्ञांशी चर्चा केली. त्यांचे याविषयी नेमके काय म्हणणे आहे, हे ऐकूनच पुढील निर्णय घेणार आहोत, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी