मुंबई : विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन राज्यभरात विविध ठिकाण विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच या घटनेचे विधिमंडळात देखील पडसाद उमटले आहेत. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही टीका केली. सोमैयांचे प्रकरण अतिशय गंभीर असून राज्य शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली केली आहे. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
सोमैयांना राज्याबाहेर काढा : राज्यातील विरोधी पक्षांचे कर्दनकाळ ठरलेले माजी खासदार, भाजपचे नेते किरीट सोमैया यांचा एका कथित व्हिडीओ व्हायरल झाला. राज्यभरात सोमैयांच्या विरोधात तीव्र मोर्चे, आंदोलन सुरु झाली आहेत. घाणेरडे चाळे करणाऱ्या किरीट सोमैयांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याचे नारे विरोधकांनी देण्यास सुरवात केली आहे. तसेच या घटनेचा विरोधकांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. विधिमंडळातही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. सत्तेला पाठिंबा देणारे घटक पक्ष वगळता सोमैयांनी विरोधकांवर अनेकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती करुन अडचणीत आणले आहे. मात्र, व्हायरल व्हिडीओची संधी चालून येताच, विरोधकांनी सोमैयांची कोंडी केली आहे. सरकारने सोमैयांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
सरकारची मराठा आरक्षणाबाबत भूमिका : यावर कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. सोमैयांचे प्रकरण गंभीर आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. नांदेडमधील एक गृहस्थ आज उपोषणाला बसले आहेत. नवीन सरकारची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे? केंद्र आणि राज्य सरकार काही निर्णय घेईल का? उपोषणाला बसलेल्या व्यक्तीचे उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकार काही करणार आहे का? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी सरकरवर उपस्थित केले आहेत. त्या गृहस्थाचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी तिकडे जाईल, असे आश्वासन सरकारने दिल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.