मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांची पोलखोल करण्यासाठी आज भाजपकडून 'आता बघाच तो व्हिडीओ' हा ठेवण्यात आलेला 'शो' फ्लॉप झाला. राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' सांगत जे पुरावे जनतेसमोर मांडले त्याची पोलखोल भाजपला करण्यात अपयश आले. त्यामुळे वांद्रे येथील रंगशारदामध्ये घेण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे यांचाच अधिक प्रचार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दाखवलेल्या व्हिडिओतून झाला असल्याच्या गप्पा उपस्थितांमध्ये रंगल्या होत्या.
शेलार यांनी मोठा गाजावाजा करत रंगशारदामध्ये दोन मोठ्या स्क्रीनवर राज ठाकरे यांची पोलखोल करण्यासाठी लवाजमा केला होता. ठाकरे यांनी मागील २० दिवसांत जे जे दाखवले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले ते कोणत्याही पुराव्यानिशी आणि आधार नसलेले होते, असा दावा शेलार यांनी करत ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांनी दाखवलेल्या ३२ प्रकरणात आरटीआयमधून माहिती घेतली नाही, भाजपकडून फुटेज घेतले नाहीत, अर्धवट बातमीवर खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला पुरावा दिला नाही. म्हणूनच आम्ही ठाकरे यांच्या असत्य व खोट्या प्रचाराची आम्ही पोलखोल करत आहोत, असे सांगत शेलार यांनी काही व्हिडिओ दाखवून भाजपची बाजू सत्याची असल्याचा दावा केला.
सत्याच्या आधारावर राजकारण करणे आमची संस्कृती तर असत्यावर बोलणे राजची प्रकृती आहे. त्यामुळे राज ठाकरे हे राम गणेश गडकरी यांच्या कवितेतील 'चिंतातुर जंतू' आहेत. त्यांची आम्हाला राजकीय मुक्ती करायची आहे, असा इशारा देत आपली खंत व्यक्त केली आणि मित्रा खरच तू चुकलाच, अशी भावना व्यक्त केली.
सुरुवातीला शेलार यांनी मागील काळात अजित पवार, छगन भुजबळ, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीका, त्यांच्या नकला दाखवल्या. मोदींना प्रश्न विचारत आहात पण आज भाजपचे राज्यात खासदार, आमदार, महापौर नगरसेवक यापेक्षा केवळ सरपंच किती आहेत हे सांगितले तर राज यांची पळताभुई थोडी होईल.
मोदींच्या गर्दीचा राज यांनी जो व्हिडिओ दाखवला, ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेची गर्दीची होती, असा दावा शेलार यांनी केला. नोटबंदीचा निर्णय हा एका रात्री झाला नाही, तो काही झटका आला म्हणून केला नाही. सरकारने जनतेशी संवाद साधला आणि नंतर केला. नोटाबंदीनंतर ३ लाख ३४ हजार बोगस कंपन्या बंद झाल्या. घरांच्या किंमती कमी झाल्या, असा दावाही शेलार यांनी केला.
घोटाळा दाखवा आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे आव्हान शेलार यांनी ठाकरे यांना दिले. ठाकरे यांनी मांडलेली पुलावामा, राज्यात वाढलेल्या बलात्कार, पंतप्रधान मोदी यांचे दत्तक गाव, आदींची सर्व बाजू खोटी होती, असे सांगत त्याबदल्यात करण्यात येत असलेल्या खुलाशाच्या व्हिडिओत, मात्र शेलार यांनी ते कुठून घेतले हे सांगितले नाही. तर शेलार यांनी अनेक संकेतस्थळांचे आणि वाहिन्यांचे नावेही गायब करून व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.