मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागणारेच प्रजासत्ताकदिनी बार आणि पब्ज उघडे ठेऊ शकतात, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मर्यादित स्वरूपात मुंबईत प्रायोगिक तत्वावर 24 तास दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या कचाट्यात सापडलेल्या मॉलमधील व्यापारी दुकानदारांना फायदा होणार असल्याने त्याबद्दल शेलार यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी रहिवाशी विभागात पब्ज आणि डान्सबार सुरू होणार असतील तर त्याला भाजपचा ठाम विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत सध्या मर्यादित स्वरूपात नाईट लाईफ सुरू करण्यात आले असले तरीही भविष्यात ते रहिवासी भागात देखील सुरू करण्यात येतील, अशी भीती शेलार यांनी व्यक्त केली. त्यासोबतच रात्री हॉटेल आणि पब्ज सुरू राहणार असल्याने त्याचा परिणाम शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर होईल, असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच कामगार विभाग, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, अग्निशमन यंत्रणा यांच्यावरही या निर्णयाचा परिणाम होईल, असे शेलार यांनी स्पष्टपणे सांगितले.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
यावेळी सरकारच्या नाईट लाईफच्या धोरणावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारच डोके ठिकाणावर नसल्याचे सांगितले. 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात असल्याने त्या दिवशी ड्राय डे असतो. मात्र, आपल्या राजकीय भूमिकेप्रमाणेच ताळतंत्र सोडलेल्या सरकारने त्याच दिवशी मॉलमधील पब्ज आणि बार सुरू ठेवायला परवानगी दिल्याने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
अहमदाबादमध्ये 'नाईटलाईफ' मग मुंबईत विरोध का..?
मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याचा निर्णय आता घेण्यात आला असला तरीही गुजरातमधील अहमदाबाद शहरात यापूर्वीच नाईट लाईफ आहे. मग असे असताना फक्त मुंबईतील नाईट लाईफला भाजपचा विरोध का? असा प्रश्न शेलार याना यावेळी विचारण्यात आले, त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी गुजरातमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे त्यांनी नाईट लाईफ सुरू केली. तरी त्या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण पडत नसल्याचे मत त्यांनी मांडले.