नवी मुंबई - अतिरिक्त कामाचा भार आणि तुटपुंजे मानधन यामुळे आशा सेविका आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी शनिवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यलयावर धडक मोर्चा काढला. यावेळी प्रत्येक आशा सेविकेने तोंडावर सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून प्रशासनाचे लक्ष वेधले. नवी मुंबईतील सीवूड्स येथील उड्डाणपुलाजवळून निघालेल्या या मोर्चात दोनशेपेक्षा जास्त आशा सेविका सहभागी झाल्या होत्या. राज्य गटप्रवर्तक संघटना आणि आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 248 आशा सेविका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीमार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय शहरी अभियानांतर्गत कार्यरत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून आशा सेविकांना मानधन दिले जाते. पालिकेत कार्यरत आशा सेविकांना दिले जाणारे मानधन आणि शासनाने निश्चित केलेले मानधन यामध्ये तफावत असल्याने या सेविकांना कमी मानधन मिळते.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत 'वर्षा'च्या भिंतींवर आक्षेपार्ह लिखाण
महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि नवी मुंबईतील सचिव गजानन भोईर यांनी मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी बाबासाहेब सोनावणे, वैद्यकीय अधीक्षक रत्नप्रभा चव्हाण यांच्याशी चर्चा केली. आशा सेविकांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय आरोग्य अधिकारी सोनवणे यांनी दिले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सोनावणे यांनी दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी न झाल्यास आशा सेविका असहकार आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.
गर्भवती महिलेची प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूती, बाळाचे लसीकरण अशा सुमारे 58 कामांचा भार आशा सेविका पेलतात. तरीही आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्न आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांनी उपस्थित केला.
आशा सेविकांच्या मागण्या -
1) सरकारने ठरवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त करण्यात येणाऱ्या कामासाठी अतिरिक्त मानधन मिळावे.
2) नागरी आरोग्य स्तरावर मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी.
3) प्रत्येक 6 महिन्याला नियुक्ती पत्र देण्याची प्रथा बंद करावी.
4) प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला वेतन मिळावे.
5) प्रती महिना मोबाईल खर्चासाठी 300 रुपये मिळावेत.
6) सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा.