मुंबई - मुंबईबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला तिने केलेले विधान महागात पडणार असल्याची चिन्हे आहेत. ती 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. मात्र, आज तिची कोरोना चाचणी घेण्यात आली. तो अहवाल आल्यानंतर ती उद्या 8 सप्टेंबरलाच मुंबईत येण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईत विमानतळावर उतरताच तिला केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. यामुळे मुंबई महापालिकेवर व राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेने कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुंबई कंगनाची कर्मभूमी असताना तिने असे वक्तव्य केल्याने शिवसेनेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेनेने विविध ठिकाणी आंदोलनही केले आहे.
तर मी मुंबईत येत आहे. कोणामध्ये हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असेही वक्तव्य कंगनाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागते. त्याचप्रमाणे कंगना मुंबई विमानतळावर उतरताच तिला 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसे न केल्यास तिच्यावर साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
हेही वाचा - कंगना रणौत विरोधात गोरेगावच्या वनराई पोलीस स्थानकात तक्रार दाखल
कार्यालयाचीही केली तपासणी -
दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे. नियमानुसार या कार्यालयाचे बांधकाम बेकायदेशीर झाले आहे काय़ याची पाहणी आज पालिका अधिकाऱ्यांनी केली. कंगनाच्या कार्यालयाचे सुशोभीकरण सुरू असताना पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघड झाल्यास याबाबत कारवाई केली जाऊ शकते. तर याबाबत कंगनाने आपले कार्यालय पालिका तोडणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
क्वारंटाईन व्हावेच लागणार -
अभिनेत्री कंगना रणौत ९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. ती मुंबईत राहत असल्यामुळे ती विमानमार्गे मुंबईत आली तर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावेच लागेल. हा केंद्र आणि राज्य सरकारने बनवून दिलेला नियम आहे. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करत आहोत. समजा, ती सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाईन नियम तिला लागू होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.