मुंबई - शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या ४ महिन्यापासून मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ बसली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या कुटुंबातील आनंदाचा आणि उत्साहाचा लग्नसमारंभाचा कालावधीही असाच निघून गेला. अशा या वातावरणात चेंबूरमधील काही रस्त्यांवर एक अनोख्या प्रकारचा विवाहसोहळा नागरिकांना पाहायला मिळाला आहे. या विवाहसोहळ्याची रंगत पाहून मन प्रसन्न झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात कोरोना काळात खीळ बसलेल्या लग्न सराईचा समारंभ सोहळा चित्रकलेच्या माध्यमातून येथील भिंतीवरती रेखाटण्यात आला आहे. लग्नसोहळ्यातील अनेक दृश्ये नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहेत. बँड बाजा बारात, वरात, अक्षदा पडतानाची दृश्ये, बोहल्यावर चढलेली नवरा-नवरी, वाजत्री, लग्नघाई सुरू असलेले वऱ्हाडी अशा सर्व प्रकारची जीवंत दृश्ये येथील भिंतीवरती रेखाटली आहेत. त्यामुळे येथील भितींना एखाद्या विवाहस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चेंबूर येथील पाच नंबर गल्लीत ही लग्न सोहळ्याची चित्रे साकारण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पूर्व उपनगरातील चेंबूर येथे 'चेंबूर महोत्सव' पार पडला होता. यावेळी या महोत्सवात 'लग्न' ही थीम सर्व चित्रकारांना देण्यात आली होती. या थीमला अनुसरण काही विद्यार्थांनी लग्न या विषयावर भिंत रंगवून या लॉकडाऊन काळात रखडलेल्या अनेकांच्या लग्न समारंभाच्या आनंदाला एक दिशा देण्याच काम केलं आहे. सध्या ही भिंत चेंबूर सह अनेक कलाकारांच्या आकर्षणाचे ठिकाण झाले आहे.
चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात असलेली ही पाच नंबर गल्लीची भिंत शाळा, कॉलेज मधील विविध कलाकार विद्यार्थ्यांनी रंगवली आहे. या कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी नयनरम्य चित्रे रेखाटून लग्न समारंभाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. ही भित्ती चित्रे आता अनेक जणांचे आकर्षण ठरली आहेत, या ठिकाणी अनेकजण भेट देत असून तरुणाईकडून सेल्फीही घेतले जात आहेत.