मुंबई- लोकल रेल्वेच्या मध्य मार्गावर नेहमी मोठी गर्दी असते. याचा फायदा घेत या मार्गिकेवरी विविध स्थानकावर चोरी, महिलांची छेडछाड अशा गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवत गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या नाशिक, मनमाड, व घाटकोपर या स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी केली जाणार आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आरपीएफ पोलिसांकडील असलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा तपशील तपासणार आहे.
स्टंट बाज तसेच, रेल्वे स्थानकावरील एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यास याची माहिती आरपीएफला दिली जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावरील वाढत्या गर्दीचे अलर्ट सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांना दिले जाणार आहेत. यामुळे वेळीच आरपीएफ व संबंधित सुरक्षा यंत्रणांना कारवाई करण्यास मदत होणार आहे.
सध्या या आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या कार्यप्रणालीची क्षमता मध्य रेल्वेकडून तपासली जाणार आहे. यात हा प्रयोग यशस्वी झाला तर मध्य रेल्वेच्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ही योजना राबवली जाणार आहे. आरपीएफकडून लवकरच मुंबईतील रेल्वे स्थानकावर बॅग स्कॅनर लावण्यात येणार आहे.