मुंबई - पीएमसी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर या बँकेचे 16 लाख बँक खातेदार हवालदिल झालेले आहे. या घोटाळ्याचा फटका मुंबईतील शीख समुदायांच्या गुरुद्वारांना आणि शाळांनासुद्धा पडला आहे. मुंबईतील दादर येथील गुरू सिंग सभा गुरुद्वाराचे तब्बल 25 कोटी रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. त्यामुळे गुरुद्वारामध्ये चालणारा लंगर तसेच इतर आरोग्य सुविधा नागरिकांना देणे आता कठीण होऊन बसले आहे.
मुंबईतील सायन परिसरातील गुरुनानक शाळेचे तब्बल 18 कोटी रुपये पीएमसी बँकेत अडकून पडले आहे. त्यामुळे शाळा चालवणे, शिक्षकांना वेतन देणे ही कठीण झाले असल्याचे गुरुनानक विद्यालयाचे प्रतिनिधी राजा सिंग यांनी म्हटले आहे. मुंबईत असलेल्या एकूण गुरुद्वारांचा जवळपास 500 कोटींहून अधिकचा निधी पीएमसी बँकेमध्ये ठेवी स्वरुपात आहे. मात्र, बँकेतील घोटाळा प्रकरणामुळे हा निधी अडकून पडला आहे. यामुळे, शीख समुदायाकडून कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी देण्यात येणारी मदत देखील थांबली असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजितसिंग अरोराची पोलीस कोठडीत रवानगी
शीख समुदायाकडून गुरुद्वाऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाला लंगरच्या माध्यमातून अन्न दिले जाते. मात्र, बँकेत अडकलेल्या पैशांमुळे, गुरुद्वाऱ्यात असलेल्या दानपेटीचा वापर केला जात आहे. तसेच दानपेटीतील उपलब्ध पैशांवरच सध्या लंगर सुरू असल्याचे राजा सिंग यांनी म्हटले आहे. सध्याची परिस्थिती जरी बिकट असली तरी गुरुद्वाऱ्यातला लंगर थांबणार नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करा, आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया