मुंबई - टीआरपी घोटाळ्यात अटक करण्यात आलेले 'बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या चौकशीतून रोज नवी माहिती समोर येत आहे. त्यासोबतच, रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांचा या घोटाळ्यातील सहभाग दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवरून महाराष्ट्र काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला घेरले असून, मोदी सरकार अर्णब गोस्वामी यांना संरक्षण का देत आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
हेही वाचा - उर्जामंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली; मनसेची पोलिसांत तक्रार
गोस्वामींना अटक करण्यासाठी व त्यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज कांदिवली येथील समता नगर पोलीस स्थानकाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णब गोस्वामींविरोधात घोषणाबाजी केली व पोलिसांना याबाबत पत्र दिले. टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात स्पष्ट पुरावे हाती आले आहेत. असे असतानाही भ्रष्टाचारी अर्णब यांच्या विरोधात कारवाईची मागणी भाजप का करत नाही? देशाला याचे उत्तर हवे आहे, असे सावंत म्हणाले.
मोदी सरकार अर्णबला संरक्षण का देत आहे? तो भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्याला पाठिशी घातले जात आहे का? त्याला बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती कोणी पुरवली? असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला. अर्णब गोस्वामी यांना ताबडतोब अटक करून रिपब्लिक टीव्हीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - अर्णब गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल करा - भाई जगताप