मुंबई - इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज (सोमवारी) फेटाळला. शनिवारी दिवसभर सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता.
अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या क्वारंटाइन जेलमधून सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवले असल्याचे सांगितले जात आहे. तरी याबाबत आता वेगळी कारणे पुढे येत आहेत. अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात असताना आपला मोबाइल फोन वापरल्याचे समोर आले आहे. तुरुंगात असताना त्यांच्याकडे फोन आला कसा? याची चौकशी आता सुरू आहे. तर अर्णब यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले. आपला जीव धोक्यात असल्याचे त्यांनी पोलिसांच्या व्हॅनमधून प्रसार माध्यमांना सांगितले होते. आपल्या वकिलाशी बोलण्याची परवानगी दिली जात नव्हती आणि कोठडीत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, असे आरोपही गोस्वामी यांनी केले.
हेही वाचा - अर्णव गोस्वामी अटक प्रकरण; तळोजा जेल येथून रिपोर्टर लाइव्ह
पोलीस निरीक्षक वराडेंवर हलगर्जीपणाचा ठपका
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करणाऱ्या सुरेश वराडे यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. अन्वय नाईक हत्या प्रकरणात अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी योग्य तपास न करता, हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गृह विभागाकडून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. सध्या ते पालघरमध्ये कार्यरत आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला होता. तेव्हा पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना अटक केली आहे. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यावर योग्य तपास केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरेश वराडे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.