मुंबई - मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतूदीच्या अधीन राहून पाणी वापरास परवानगी देण्यात आली आहे.
पाणी वापराचे नियोजन
गोदावरी खोऱ्यात १९७५ च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यातील टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. त्यानुसार १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी मंत्री पाटील यांनी मान्यता दिली आहे. आता १९.२९ टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. यापूर्वी ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती.
मराठवाड्याला जास्तीत जास्त पाणी देणार -
जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. त्यातील काही प्रकल्प तिथे पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत आणि याचे सर्व श्रेय मराठवाड्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला देईल अशी ग्वाही, मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान मागच्या कालखंडात मंत्री पाटील यांनी या भागात दौरा करत या भागातील प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. मराठवाड्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत असल्याचे हे चित्र आहे. तसेच मंत्री पाटील यांनी विजयादशमी आणि दसऱ्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल