मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात आणि राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सायबर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या सायबर विभागाकडून महाराष्ट्र सायबर अँटी फिशिंग पोर्टल बनवण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्यासाठी व सायबर सुरक्षा हाताळण्यासाठी मदत होणार आहे. राज्याचे सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख ब्रिजेश सिंग यांनी याबद्दल माहिती दिली.
अशा प्रकरचा अँटी फिशिंग पोर्टल तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बिल पेमेंट, ऑनलाईन बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत.तसेच त्या मोठ्या प्रमाणावर वापरल्यासुद्धा जात आहेत. खास करून ग्रामीण आणि शहरी भागात याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन सायबर गुन्हेसुद्धा वाढत आहेत.
त्याचप्रमाणे सध्या ओटीपी, एसएमएस, मेल इंटरनेटच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला जातोय. अशाच प्रकारच्या नेट फिशिंगच्या माध्यमातून लोकांची आर्थिक लूटसुद्धा होत आहे. अशा प्रकारच्या घटना दरवर्षी वाढत जात असल्यामुळे राज्य शासनाकडून यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून हे अँटी फिशिंग पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे.
कसा होणार वापर -
एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचे फोन कॉल्स येत असतील तर त्या व्यक्तीने पोर्टलवर जाऊन या प्रकारची माहिती व नंबर उपलब्ध करून दिल्यास त्याची नोंद तात्काळ घेतली जाणार आहे. अँटी फिशिंग पोर्टलवर देण्यात येणाऱ्या माहितीवरून शहानिशा केल्यानंतर संबंधित बँका व इतर यंत्रणांना याची सूचना केली जाईल व त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते या अँटी फिशिंग पोर्टलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. देशात औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचे अँटी फिशिंग पोर्टल उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे याचा फायदा सायबर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्कीच होईल.