मुंबई - एकनाथ खडसेंनी काल अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून खडसेंवर केस केली, असे सांगितले. खडसेंचे ते वक्तव्य पूर्णपणे खोटे आहे. खडसे राजकारणातील कचरा आहेत. त्यांनी मला फार त्रास दिला, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दमानिया बोलत होत्या.
खडसेंच्या कालच्या वक्तव्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. खडसेंना धडा शिकवण्याचा मी निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबर २०१७ला खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एका सभेत माझ्यावर खालच्या पातळीची टिप्पणी केली होती, असे दमानिया म्हणाल्या. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. खडसेंविरोधात दाखल असलेला ५०९चा गुन्हा अद्याप संपलेला नसल्याचे दमानिया म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांनी मला मदत केलेली नाही. त्यांना फक्त सोईचे राजकारण करता येते. खडसेंना मी धडा शिकवण्यासाठी खंबीर आहे. ते कुठल्याही पक्षात जावोत, मला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही. मी जो गुन्हा दाखल केला त्याच्याशी फडणवीसांचा काही संबंध नाही. खडसेंनी मुद्दाम मला त्रास देण्यासाठी माझ्या विरोधात ६ जिल्ह्यात ३२ केस दाखल केल्या आहेत. माझ्यासाठी लढलेल्या चित्रा वाघ आणि नीलम गोऱ्हे यांना आता हे दिसत नाही का? शरद पवारांनी खडसेसारख्या भ्रष्टाचारीला पक्षात कसे घेतले? असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले.