मुंबई Anil Kumble : देशात सध्या क्रिकेट विश्वचषकाची धूम सुरू आहे. स्पर्धेत भारतानं दमदार सुरुवात केली असून, टीम इंडियानं आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत.
'गेम चेंजिंग मोमेंट्स' पुस्तकाचं प्रकाशन : या पार्श्वभूमीवर आज (१८ ऑक्टोबर) मुंबईत प्रसिद्ध क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांच्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. 'गेम चेंजिंग मोमेंट्स' असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप राऊ यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.
हा क्षण सर्वात अविस्मरणीय होता : यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी अनिल कुंबळे यांची दिलखुलास मुलाखत घेतली. यावेळी बोलताना अनिल कुंबळे यांनी क्रिकेटच्या जुन्या आठवणी, मैदानावरील प्रसंग तसेच ड्रेसिंग रूमधील किस्से आदींना उजाळा दिला. १९९९ साली दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध घेतलेले १० बळी हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता, असं ते म्हणाले. तसेच १९९२ मध्ये जोन्हसबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट घेणं हे देखील माझ्यासाठी खूप स्पेशल होतं, असंही कुंबळे यांनी सांगितलं.
पुस्तकात भारतीय क्रिकेटचा प्रवास मांडला : 'गेम चेंजिंग मोमेंट्स' पुस्तकात भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून नुकत्याच झालेल्या महिलांच्या प्रीमियर लीगपर्यंतचा भारतीय क्रिकेटचा प्रवास मांडण्यात आला आहे. या पुस्तकातून वाचकांना क्रिकेटबद्दल बरीच नवीन माहिती मिळेल. खेळाची दिशा बदलणाऱ्या १८ महत्त्वपूर्ण गेम चेंजिंग मोमेंट्सद्वारे क्रिकेटचा एक उल्लेखनीय प्रवास या पुस्तकातून उलगडण्यात आलाय. या पुस्तकात १९३२ पासूनचा भारतीय क्रिकेटचा प्रवास तसेच वेगवेगळ्या कालखंडातील चार दिग्गज क्रिकेटपटू, मोहिंदर अमरनाथ, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मिताली राज यांच्या विशेष मुलाखती आणि त्यांच्या अनुभवांची सांगड वाचायला मिळेल.
हेही वाचा :
- Cricket In Olympics : क्रिकेटसह आणखी ४ खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, मुंबईत झाला निर्णय
- Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी
- World Cup 2023 : पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक; रोहित शर्मावर मुश्ताक मोहम्मद यांनी उधळली स्तुतीसुमने