मुंबई: ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीण अर्जावर आज सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणातील सर्व केसची एकाच न्यायाधीशा समोर सुनावणी होणार असल्याने आज न्यायालयाने या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींची यादी बनवली त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळा नंबर देण्यात आला त्यामध्ये माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना 15 क्रमांक देण्यात आला आहे.
ऋषिकेश, देशमुख यांना 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजावला आहे.ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा आरोप ईडीने केला आहे. आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.
९ फेब्रुवारीपर्यंतचा ईडीला वेळ
अनिल देशमुखांतर्फे यापुर्वीही जामीनासाठी वेळोवेळी अर्ज करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता, रेग्युलर जामीनसाठी त्यांनी नव्याने अर्ज केला आहे. पीएमएलए कोर्टात आज जामीन अर्जावर सुनावनी झाली. ईडी तर्फे देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावनीसाठी वेळ मागण्यात आला आहे. त्या अनुशंगाने न्या. आर एन रोकडे याने ९ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ ईडीला दिला असुन या प्रकरणाची पुढील सुनावनी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
देशमुख आणि परब यांच्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्रालय, ज्ञानेश्वरी, सह्याद्रीवर गुप्त बैठका व्हायच्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह आणि सरकारी निवासस्थान असलेले ज्ञानेश्वरी येथे गुप्त बैठका झाल्या होत्या. तसेच या बैठकीमध्ये अनिल परब हे यादी घेऊन येत होते, असा खुलासा ओएसडी रवी व्हटकरांनी जबाब नोंदवताना केला आहे. पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते व मंत्री अनिल परब हे अनिल देशमुखांना भेटायचे, असा खुलासाही ओएसडी रवी व्हटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीपूर्वी अनिल देशमुख आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यात गुप्त बैठक व्हायची. या बैठकीत कॉग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेकडून अनिल परब हे नाव पाठवायचे. ही यादी मी ज्ञानेश्वरी, सह्याद्री अतिथीगृह किंवा मंत्रालयात दिल्याचे रवी व्हटकर यांनी जबाबात म्हटले आहे.
मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी असलेल्या समितीचे अध्यक्ष पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये PSI ते DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली. ही यादी अनिल देशमुख यांनी अनेकवेळा दिली होती. तसेच त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही यादी अनेकवेळा दिली होती. बदल्यांची यादी अनिल परब यांच्याकडूनही दिली जात होती, अशी माहिती ओएसडी रवी यांनी ईडीच्या आरोपपत्रात दिली आहे.
अनिल देशमुख यांनी देखील ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून यादी देण्यात येत होती. आता अनिल देशमुख यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनी देखील दिलेल्या जबाबामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. ईडीने अनिल परब यांचा देखील या संदर्भात जबाब नोंदवला होता.