मुंबई : संजीव पलांडे यांना ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आधीच जामीन मिळालेला आहे. त्यानंतर त्यांना आता सीबीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 100 कोटी वसुली प्रकरणात संजीव पलांडे यांना अटक करण्यात आली होती. सीबीआय प्रकरणात त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजीव पलांडे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे.
1 लाखाच्या जातमुचलक्यावर सोडणार : संजीव पालांडे यांना जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. पालांडे यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, पालांडे यांना पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत तसेच या प्रकरणातील कुठल्याही साक्षीदाराला भेटणे तथा त्यांच्याशी संवाद साधू नये असे न्यायालयाने अटी व शर्तीमध्ये म्हटले आहे.
देशमुख प्रकरणात पलांडे कसे अडकले : अँटिलिया स्फोटक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. यामध्ये मध्यस्थाची भूमिका पलांडे यांची असल्याचे सांगण्यात येत होते.
परमबीर सिंह यांचे आरोपासंदर्भात पत्र : अनिल देशमुखांनी पोलिसांना मुंबईतील बार, पब मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले, असा आरोप परमबीर सिंह यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचेही पत्रात म्हटले होते. याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाकडून तपास सीबीआयकडे : मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. याच प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि खासगी स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली होती. अनिल देशमुख हे संजीव पलांडे यांच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा आरोप आहे. याप्रकरणात संजीव पलांडे यांना दीड वर्षानंतर जामीन मिळाला आहे. पलांडे यांना ईडीच्या प्रकरणात आधीच जामीन मिळालेला असल्याने तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे प्रकरण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
संजीव पालांडे 100 कोटी वसुली प्रकरणात आरोपी : यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.