मुंबई - कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सामूहिक शक्तीचे दर्शन घडविण्याचे आवाहन केले आहे. 5 एप्रिल रात्री 9 वाजून 9 मिनिटांसाठी देशात प्रकाशाचा तेज निर्माण करा, यामुळे 130 कोटी जनतेची महाशक्ती या संकटाविरोधात एकवटली आहे हे दिसून येईल, असे सांगितले. त्यामुळे, थाळीनंतर आता दिवे लावण्याच आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. यावर अनेक जण टीका करत असून दिग्गज कलाकार आणि क्रिकेटर्सही सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. अभिनेता आमीर खानने मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच एक फोटो ट्विट केला आहे. आमिरचा हा इशारा मोदींच्या भाषणाकडेच असल्याची चर्चा ट्विटरवर रंगली आहे.
मोदींच्या भाषणानंतर, मोदी विरोधकांनी, भक्तलोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरतील, असे म्हटले आहे. तर, दिग्दर्शक फराह खाननेही ट्विट करून देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. कुणीतरी एखादा आर्थिक तज्ज्ञ नियुक्त करावा आणि देशातील आर्थिक परिस्थितीचा सामना व उपाय करावेत, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता आमिर खानचे ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. आमिरने ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, टोल फ्री क्रमांक दिला असून मानसोपचार तज्ज्ञाला बोलण्यासाठी येथे कॉल करा, असे म्हटले आहे. मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच आमिरने हा फोटो ट्विट केल्यामुळे त्याच्या ट्विटवर तशाच प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी आमिरचे समर्थन केले आहे, तर काहींनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत, त्यावर का ट्विट केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा - मोफत अन्न धान्याच्या नावाने सरकार गोर गरिबांची उपेक्षा करतंय