मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणामध्ये शिंदे - फडणवीस सरकारने केलेल्या कामांची प्रशंसा करत त्याची स्तुती सुमने गायली. तसेच राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणाचे वाचन हिंदीमध्ये केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाकडून व्हीप नाही: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप जारी करण्यात आल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अशा पद्धतीने कुठलाही व्हीप जारी करण्यात आलेला नाही आहे. फक्त अशा पद्धतीच्या चर्चा करून दिशाभूल करण्याचे काम शिंदे गटांकडून केले जात आहे. जर त्यांनी अशा पद्धतीचा वेब जारी केला असेल तर तो त्यांनी दाखवावा, असे सांगत ते अशा पद्धतीचा व्हीप जारीच करू शकत नाही, असेही दानवे म्हणाले आहेत.
राज्य सरकारवर जोरदार टीका: आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी हिरकणी कक्षावरून सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. हिरकणी कक्षाची दुरावस्था त्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली. याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, विधिमंडळ हे सर्वोच्च असे राज्यातील स्थान आहे त्या ठिकाणी जर हिरकणी कक्षाची अशा पद्धतीने दुरावस्था असेल तर राज्यात इतर ठिकाणी परिस्थिती काय असू शकते याचा विचारही आपण करू शकत नाही. या सरकारची काम म्हणजे धन दांडग्यांना महसूल माफ करणे, बुलेट ट्रेन तसेच निवडणुकीत पैसे वाटणे असे आहेत. बुंद जाती है, वह हौद से आती नही, असेही दानवे म्हणाले आहेत.
शिंदे - फडणवीस सरकारने काय केले?: राज्यपालांनी आज हिंदीमध्ये केलेले भाषण हे एक प्रकारे दुर्दैवी असल्याचे सांगत आज मराठी भाषा दिनीतरी त्यांनी मराठीमध्ये भाषण करायला हवे होते, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. तसेच या भाषणांमध्ये अर्ध भाषण हे केंद्र सरकारने केलेल्या कामाविषयी व अर्धे भाषण हे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाविषयी होते. तर मग शिंदे - फडणवीस सरकारने नेमके काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.