मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला शिवसेना बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीत विविध ठराव पास करताना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून शिंदेंची शिवसेनाला चिमटा काढला. भाजपचे तळवे चाटणाऱ्या बटीकांनी सावरकरांना आता तरी भारतरत्न मिळवून द्यावा, असा टोला दानवे यांनी लगावला.
अंबादास दानवेंची बैठकीवरून टीका: सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात खळबळ उडाली. शिंदे सेनेने मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना प्रमुख नेता करण्यापासून विविध ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला.
हा आनंद फार काळ नाही: अंबादास दानव पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता बनवला असला तरी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेला निर्णय संपूर्ण हिंदुस्तान महाराष्ट्रातील जनता आणि लहान मुलांना देखील कळतो आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने हे एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावर चर्चा चालू आहे आणि विशेष सुप्रीम कोर्ट सुद्धा या विषयाची दखल घेईल आणि योग्य तो न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असे दानवे म्हणाले.
'हे' तळवे चाटतात: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव शिंदे सेनेच्या बैठकीत मंजूर झाला. यावरूनही दानवे यांनी टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न दिला पाहिजे, ही मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना करत आहे. आता ते सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ते बटीक बनलेलेच आहे. भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या नेत्यांचे तळवे ते चाटतातच आहेत. त्यामुळे आता त्यांनी सावरकर यांना भारतरत्न तरी मिळवून द्यावा, असे दानवे यांनी म्हटले. तसेच शिस्तभंग कारवाईसाठी त्रिसदस्य समिती नेमली आहे. या समितीचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना जे नियम लावायचे आहेत, ते त्यांनी लावत बसावे. ठाकरे साहेबांसोबत असलेल्या आमदारांना त्याचा काही संबंध नाही. असेही त्यांच्या कारवाईला कोणी कुत्रे भीक घालत नाही, असे दानवे यांनी सांगितले.
कायद्याचे राज्य आहे का?: राज्यात कायद्याचे सरकार कार्यरत आहे का? अशी स्थिती आहे. खासदार संजय राऊत यांना धमकी आली आहे. अशोक चव्हाण यांच्या सारख्या एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री यांनाही पोलिसांच्या दारात जावे लागते. एका महिला आमदार सातव त्यांच्यावर हल्ला होतो. अवैद्य धंदे राजरोस सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का किंवा महाराष्ट्रात राज्यच आहे की नाही, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री दौरे करत फिरत आहेत. राज्य कारभारात त्यांचा कुठे ही लक्ष नाही. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अधोगतीला आली आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
राज्य सरकारवर टीका: दानवे पुढे म्हणाले की, आजच्या घडीला यांनी दिलेल्या स्थगितीमुळे 50 टक्के सुद्धा बजेट खर्च झालेले नाही. महाराष्ट्राची पूर्णपणे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ही लोक महाराष्ट्राला एक प्रकारे आर्थिक खाईच्या दरीत लोटतात की काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहते आहे. त्यामुळे हे सरकार अकार्यक्षम असून भ्रष्टाचारी आहे. या सरकारला निश्चित अधिवेशनात योग्य त्या पद्धतीने धारेवर धरले जाईल, असे दानवे यांनी म्हटले.
हेही वाचा: Shinde vs Thackeray Live Update : सत्तासंघर्षावरची आजची सुनावणी संपली