मुंबई : राज्यात शिंदे, पवार गटाने 50 खोके तसेच गद्दारांचा शिक्का कपाळावर मारून घेतला आहे. काहीही केले तरी, तो पुसला जाणार नाही, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे, पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी, आक्रमकपणे सरकारला जाब विचारू, असा दावा त्यांनी केला आहे.
राज्यात बेहिशेबी मंत्री : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दहा दिवस उलटून गेले तरी खाते वाटप झालेले नाही. अजित पवार यांना आर्थ खाते देण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध आहे. सध्या राज्यात बेहिशेबी मंत्री असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळातील खातेवाटपासाठी शिंदे, पवार गटाची भाजपसोबत बोलणी सुरू आहे. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
अजित पवार दिल्लीत झुकले : अजित पवार विरोधात असताना त्यांनी सातत्याने शिंदेंच्या दिल्लीवारीवर टीकेचे बाण सोडले होते. भाजपने देखील सिल्वर ओकवरून शरद पवार शिवसेना चालवतात, असा आरोप केला होता. अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीसमोर झुकावे लागत आहे. शिंदे गटाप्रमाणे मुजरा करावा लागत आहे. महाराष्ट्रात यासारखे दुर्दैव नाही. अजित पवारांचा आता नेते कोण?, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपने एकप्रकारे राजकारणाचा खेळखंडोबा केला, भाजपचे विरोधक संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दानवे म्हणाले.
राज्यात गुन्हेगारी वाढली : राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पुणे, नागपूर भागात गुन्हेगारी वाढली आहे. महिला, मुली सुरक्षित नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा देशात गुन्हेगारीत सहाव्या क्रमांकावर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर शहरात महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. राज्याला संवेदनशील गृहमंत्री नाही. मुंबईत हॉस्टेलमध्ये मुलीवर बलात्कार होतो. सरस्वती वैद्य हिची हत्या केली जाते. शरीराचे तुकडे तुकडे केले जातात, ही उदाहरणे दानवेंनी दिली.
राज्यात फोडाफोडीचे राजकार : पुरोगामी महाराष्ट्राचे गृहमंत्री, राज्यात सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीच्या राजकारणात व्यग्र आहेत. अकार्यक्षम असे गृहमंत्री राज्याला लाभले असून कायदा सुव्यवस्थेऐवजी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांना सांभाळण्यात वेळ घालवत आहेत, असा घणाघात दानवे यांनी केला आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी एका तरुणाने रक्ताने पत्र लिहिले आहे. त्याच्या रक्ताचा एकही थेंबा वाया जाऊ देऊ नये, अशी भूमिका सरकारने घ्यायला हवी, असे दानवे म्हणाले.
मनमानी चालणार नाही : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालय विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. कोर्टाने काही निर्देश दिल्यास फेटाळून लावेन, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले होते. विरोधी पक्षनेते दानवेंना याबाबत विचारले असता, विधिमंडळाचे अधिकार जरी असले तरी, मनमानी होऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्ष मनमानी करत आहेत. कारवाईसाठी विहित वेळ दिला असताना, दोन महिने जाणिवपूर्वक वाढले आहेत. आता मनमानी चालणार नाही, असा सूचक इशारा दानवे यांनी दिला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी, शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना घेऊन सरकारला धारेवर धरले जाईल, असे दानवे म्हणाले.
शिंदे, पवार गटावर गद्दारीचा शिक्का : मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देशभरात चांगल्याच गाजल्या. महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीत हा नारा देण्यात आला. शिंदे गटाच्या आमदारांना त्यानंतर सातत्याने टीकेचे धनी व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घोषणा दिल्या होत्या. आता अजित पवारांचा एक गट शिंदेंच्या सरकारमध्ये सामील झाला आहे. मात्र, 50 खोक्यांच्या घोषणा कायम राहतील. महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली, कानाकोपऱ्यातून हा नारा दिला जातो आहे. शिंदे, पवार गटाने गद्दारीचा शिक्का कपाळावर मारून घेतला आहे. तो कधीही पुसला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे.