मुंबई - सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते, त्यावेळेस पोलिसांचा व त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे भावोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले. रेल्वे पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले होते. त्याबद्दल त्यांचा सत्कार आज ज्ञानेश्वरी बंगला येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या होती दहिसरची घटना -
1 जानेवारी रोजी गणपत सोलंकी हे साठ वर्षाचे गृहस्थ दहिसर येथून खार येथे जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती. ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले. या कामगिरीबद्दल गृहमंत्र्यांनी आज निकम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कुटुंब प्रमुख म्हणून अभिमान -
पोलीस दलातील शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उत्तम काम करणाऱ्या तसेच समाजाप्रती आपला वेगळा ठसा उमटवून पोलीस विभागाचे नाव उंचाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. गेले वर्षभरात कोरोना योद्धे, अद्वितीय काम करणाऱ्या नवदुर्गा, कर्तव्यदक्ष असलेले पोलीस कर्मचारी या सर्वांचा सन्मान वेगवेगळ्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री या नात्याने कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे, हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादच्या नामांतरास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध