मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत युती करणार असल्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी नियोजित अनेक कार्यक्रम रद्द करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. भाजप त्यानंतर पवार यांच्याबाबत मवाळ भूमिका मांडताना दिसत आहे. टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचेही सूर बदलले आहेत. शिवसेना बुडवायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटाकडून ही अजित पवार यांच्या स्वागताची टून वाजवली जात आहे. गेल्या दोन दिवसापासूनच या राजकीय घडामोडी वाढल्याने राज्यात नव्या सत्ता समीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे.
कोणतेही तथ्य नाही: विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान भवनात आज पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, आपली भूमिका स्पष्ट केली. नव्या राजकीय समय करण्याच्या फक्त चर्चा आहेत. कोणतेही त्यात तथ्य नाही, असे स्पष्ट त्यांनी केले. तसेच, पक्ष सांगेल तसेच मी काम केले असून आज ही करतो आहे. त्यामुळे कोणालाही उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचे ते म्हणाले.
राजकीय चर्चेचा धुरळा: अजित पवार भाजप सोबत जाणार असून त्यांना चाळीस आमदारानी पाठिंबा दिला आहे. आज राजभवनात सरकारला पाठिंबा दिल्याचे पत्र राजभवनात देणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले. राज्यात त्यानंतर राजकीय घडामोडीना उत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानभवनात अजित पवार यांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राजकीय चर्चाचा धुरळा उडाल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वीही भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याच धाडस: महाराष्ट्रातील राजकारणात अजित पवार हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विशेष करून केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवारांच्या भूमिकेवर नेहमी संशय घेतला जात आहे. त्याला कारण ही तसेच आहे. कारण २०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे धाडस त्यांनी करून दाखवल आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अजित पवार हे राष्ट्रवादीतून १० ते १५ आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना पूर्ण समर्थन देत ते जी भूमिका घेतील ती आम्हाला शंभर टक्के मान्य असल्याचे सांगत, मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे आमदार माणिकराव कोकाटे हे सुद्धा मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समर्थन देणार आहेत.