मुंबई - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतल्याचा मुद्दा आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करून अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्त्युत्तर देणार इतक्यात समोरच्या बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवले. देवेंद्र फडणवीस खाली बसूनच अजित पवारांना म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही, असे सांगितल्यावर अजित पवारांनीही माघार घेत मुद्दा सोडून दिला.
आझाद मैदानात मराठा समाजातील मुलांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुलांना न्याय देण्याची मागणी करत, अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात, जसे त्यांनी रात्री ठरवले आणि सकाळी शपथ घेतली, याची आठवण चंद्रकात पाटील यांनी करून दिली. याला उत्तर द्यायला अजित पवार उभे राहिले. मराठा मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे, याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.
उत्तराच्या शेवटी चंद्रकांत पाटील यांच्या शपथविधीच्या मुद्याला अजित पवार प्रत्त्युत्तर देणार, इतक्यात समोरच्या बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवले. देवेंद्र फडणवीस खाली बसूनच अजित पवारांना म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. अशा पद्धतीने पहाटेच्या शपथविधी मागचा इतिहास पुन्हा एकदा गुलदस्त्यातच राहिला.