मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, ती 320 झाली आहे. सातत्याने प्रशासन आणि सरकारने आवाहन करुनही अनेक ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. मात्र, या गर्दी करणारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडे बोल सुनावले आहेत.
राज्यातले बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. मात्र, बेजबाबदारपणाने वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हे आता सहन केलं जाणार नसल्याचे, अजित पवार म्हणाले. बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही. लोकांनी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवलं तर, सद्यस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवारांनी दिला.
राज्यातली ‘कोरोना’रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेनं घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन अजित पवारांनी केले. गर्दी करणे सुरुच ठेवले कठोर उपाय करावे लागतील असे पवार म्हणाले.