मुंबई : Ajit Pawar Group In SC : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय निकाली काढावा यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये अजित पवार गटाविरोधात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी पक्षातून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेबाबत 9 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, दुसऱ्या बाजूने कॅव्हेट दाखल करण्याचं काही कारण नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असला, तरी आम्ही विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
अजित पवार गटातर्फे कॅव्हेट दाखल : दुसरीकडे अजित पवार गटाने देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबत एक कॅव्हेट देखील अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आली आहे. सोमवारच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात यावं अशा प्रकारे कॅव्हेट दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाचं म्हणणं ऐकून घेईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं या विषयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 6 तारखेला सुनावणी झाली. त्यानंतर पुन्हा सोमवारी शरद पवार गट आणि अजित पवार गट निवडणूक आयोगासमोर आमने-सामने येणार आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचं समोर येत आहे. सुनावणी दरम्यान शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे वकील कशाप्रकारे दावे, प्रतिदावे करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय हे विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेसंदर्भातील काय निर्णय देणार? याकडे देखील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा:
- Asim Sarode On NCP Dispute : या' कारणानं अजित पवार गटातील आमदार अपात्र ठरतील, कायदेतज्ज्ञ असिम सरोदेंनी वर्तवलं भाकित
- Internal Dispute In Congress : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत आमदारच गैरहजर
- Sanjay Raut On CM : कोण शिंदे? त्यांचं कर्तृत्व काय? संजय राऊतांनी उडवली खिल्ली