मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या निवडीला अनुमोदन दिले.
अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नवनियुक्त आमदार खासदार उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाला गोडधोड खाता आले नाही - अजित पवार
मी सांगत होतो की, अंडर करंट आहे, तसेच झाले. आम्हाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नूतन विधानमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली. जनतेने आम्हाला चांगला कौल दिला. प्रचारासाठी आणखी काही दिवस मिळाले असते तर आम्ही सत्तेत आलो असतो, असेही पवार म्हणाले. सत्ताधारी पक्षाला गोडधोड खाता आले नसल्याचेही ते म्हणाले. आम्ही उद्या राज्यपालांनी भेटण्यासाठी जात आहोत. मला आजून विश्वास वाटत नाही, की जनतेने येवढे भारभरू प्रेम दिले आहे. मुख्यमंत्री म्हणायचे माझ्या विरोधात ढाण्या वाघ दिलाय.. पण त्या वाघाचे काय झाले पाहिले का? असेही म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. तसेच पारनेर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना लोकांनी भरभरुन मदत केली आहे. त्यांना लोकांनी १ कोटीचा चेक दिला असल्याचेही पवार म्हणाले.