मुंबई - रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या ३७ दिवसात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी सुरुवात, नवी पहाट अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. अवघ्या 80 तासात आवश्यक संख्याबळ नसल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही राज्यपाल कोश्यारी यांनी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, की आता जाऊ द्या सगळं, झालं गेलं विसरून जायचं, नवी सुरुवात आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आता कसलाही विचार न करता जनतेसाठी काम करायचे असे अजित पवार म्हणाले.