मुंबई : केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील असून दिल्लीतील पोलिसांनी हाताळलेली महिला कुस्तीपटूंची केस आणि महाराष्ट्रात महिलांविरोधात वाढत चाललेल्या घटनांना सर्वस्वी महाराष्ट्र सरकारचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर अजितदादा राज्यातील राजकारणातले अमिताभ असल्याचेही गौरवोद्गार सुळे यांनी काढले आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्याध्यक्ष जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असताना कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले.
मंत्रिमंडळ विस्तार नाही : एका-एका मंत्र्यांकडे दहा ते पंधरा खाती आहेत. जिल्हा परिषद, मनपा या निवडणुका झाल्या नाहीत. महाराष्ट्र नक्की कोण चालवत आहे. हे सुपरमॅन नाहीत. सत्ता एका ठिकाणी राहू नये म्हणून शेवटी सत्तेचे विकेंद्रीकरण जे चव्हाण साहेबांनी केले. आज ते चित्र उलट दिसत आहे. पुण्यात एक आयुक्त शहर चालवत आहे. एवढ्या नगरसेवकांचे काम एकटा माणूस करतो. जिल्हा परिषद एकच माणूस चालवत आहे. हे अशक्य आहे. कारण ही सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणे लोकशाहीपासून दूर राज्य चालत आहे हे दर्शवते, असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
अजितदादा राजकारणातला अमिताभ : अभिनेता अमिताभ बच्चन सर्वांना आवडतो. तसाच तो सगळ्याच सिनेमात देखील पाहायला आवडतो. त्यांचा आवाजही चालतो, त्यांचा फोटोही चालतो, त्यांचा लूकपण चालतो, त्यांचा ऑटोग्राफही चालतो. त्यामुळेच अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर होणाऱ्या चर्चाबाबत उत्तर दिले.
पॉलिसीवर काम करणे आवडेल : आपण चेहर्यापेक्षा पॉलिसीवर का काम करत नाही असा सवाल करतानाच तुम्ही चेहर्याला मत देणार की पॉलिसीला मत देणार आहात. मला वाटते आपण पॉलिसीला महत्त्व दिले पाहिजे. केंद्राचे सोशल जस्टीस खाते पाहिले तर किती निधी आला, किती कार्यक्रम जाहीर झाले. मी संसदेत एक प्रश्न टाकला आहे, अनेक 'एम्स' झाले असे जाहीर केले जाते. परंतु किती 'एम्स' ऑपरेशनल आहेत, किती डॉक्टर आहेत याबाबत कधी विचारणा केली गेली का? त्यामुळे पॉलिसीचे काय झाले हाच प्रश्न समोर येतो, असेही खासदार सुळे म्हणाल्या. बेकायदा पोस्टर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लावतात त्यावेळेस वेदना होतात. तुम्हीच कायदा बनवतात आणि तुम्हीच तोडता हे दुर्दैव आहे. आंब्याच्या झाडावर दगड मारला जातो, बाभळीवर कोण मारत नाही' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.