मुंबई - लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या विमानप्रवासाचा परतावा देण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. पण, आता संयुक्त राष्ट्रांच्या दणक्यानंतर कंपन्या परतावा देण्यास तयार होत आहेत. त्यानुसार एअर फ्रान्स आणि केएलएम या युरोपमधील दोन बलाढ्य कंपन्यांनी परतावा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता या कंपन्याकडून तिकीट काढणाऱ्या भारतातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
जगभरात लॉकडाऊनमुळे विमानप्रवास बंद झाला आहे. तर, देशांतर्गत विमान सेवाही बंद होती. अशावेळी आगाऊ तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा नियमानुसार त्यांना परतावा देण्यास नकार देत कंपन्यानी क्रेडीट शेलचा अर्थात यापुढे सहा ते 12 महिन्यांत त्याच तिकिटावर प्रवास करण्याचा पर्याय दिला आहे. पण 83 टक्के प्रवाशांनी हा पर्याय अमान्य करत परतावा मागितला आहे. तर तो न दिल्यास न्यायालयात जाण्याचीही तयारी दाखवली आहे.
त्याचवेळी हा विषय मुंबई ग्राहक पंचायतीने उचलून धरला तसेच, यासाठी थेट संयुक्त राष्ट्रालाच साकडे घातले. संयुक्त राष्ट्राने ही मागणी मान्य करीत, या विषयात हस्तक्षेप केला आहे. त्यानुसार विमान कंपन्याना परतावा देण्यास भाग पाडावे, असे निर्देश सर्व सदस्य देशांना संयुक्त राष्ट्राने दिले आहेत. या दणक्यानंतर दोन कंपन्या जाग्या झाल्या आहेत. एअर फ्रान्स आणि केएलएम या युरोपमधील दोन बलाढ्य कंपन्या परतावा देण्यास तयार झाल्या आहेत. तसे घोषणापत्र त्यांनी जारी केल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली आहे. या दोन कंपनीकडून आगाऊ तिकीट घेणारे हजारो भारतीय प्रवासी आहेत. त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार आहे. तर, आता इतर कंपन्यावरही दबाव वाढून त्यांनाही परतावा देणे भाग पडणार आहे, असेही ते म्हणाले.