मुंबई - शहरातील आझाद मैदान येथे महाराष्ट्रातील २४ संस्थांनी एकत्र येत मराठी भाषा सक्षमीकरणासाठी आंदोलन केले. यावेळी मराठी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर, हरी नरके, डॉ. नागनाथ कोथापल्ले, डॉ. मधू मंगेश कर्णिक, डॉ. कौतिकराव ठाले पाटील, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख सहभागी झाले होते.
मराठी शाळांचे सक्षमीकरण, मराठी शाळेतील शिक्षकांना वेतनोत्तर अनुदान देणे, मराठी शाळांची शिक्षक भरती तातडीने करणे, याशिवाय राज्य सरकारच्या २०१२ च्या मास्टर प्लॅननुसार ग्रामीण भागातील २५९ शाळांचा प्रस्ताव रद्द झाला. त्या शाळा नव्याने सुरू करण्यात याव्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच सर्व बोर्डामध्ये इयत्ता पहिली ते बारावीसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सर्व साहित्यकांना एकत्र येऊन मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे दुर्दैव असल्याच्या प्रतिक्रिया जमलेल्या साहित्यकांनी दिल्या.