मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत हिने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस व मुंबई शहराबाबत केलेल्या ट्विट मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आता यात शिवसेनेच्या महिला आघाडीने देखील उडी घेतली आहे. आज शिवसेनेच्या महिला आघाडीकडून मुंबईत ठिकठिकाणी कंगना विरोधात आंदोलन करण्यात आले.
सेना भवन परिसरात शिवसेनेच्या महिला आघाडीने पुतळा जाळून कंगनाच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. तर विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागसंघटक डाॅ.भारती बावदाने यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य मुंबई महिला आघाडीच्या वतीने भाजपा नेते राम कदमाच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. वरळी नाका येथे महापौर किशोर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला तर गिरगाव चौपाटीवर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंगणा राणौत विरोधात निदर्शने केली.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र 12 च्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी व महिला विभाग संघटक जयश्री बाळलिकर यांच्या नेतृत्त्वखाली अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबईबद्दल वापरलेला अपशब्द व मुंबईकरांचा अपमान केल्याबद्दल गिरगाव चौपाटी येथे निदर्शने करण्यात आले.
अभिनेत्री कंगना रणौत आणि भाजपा मुंबई प्रवक्ते राम कदम यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कदम यांच्या घाटकोपर येथील 'द ऑरचर्ड रेसिडेन्सी' या निवास्थानावर आंदोलन केले. तसेच कदमांच्या पोस्टरला चपलांचा मारा देत कंगना आणि कदम यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुंबई कोणा बापजाद्यांची नसून ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत आहे. कोणामध्ये दम आहे, मला अडवण्याचा मला बघायचंच आहे, असं खुलं आव्हान कंगनाने दिलं होतं. या आवाहनानंतर महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या असून आम्ही तिचं आव्हान स्वीकारलं आहे. ९ स्पटेंबरला आम्ही तिला शिवसैनिकांची ताकद दाखवू, असा इशारा घाटकोपर शिवसेनेच्या महिला विभाग संघटिका भारती बावदाने यांनी व्यक्त केले. तसेच भाजपाच्या जबाबदार पादाधिकाऱ्याने अशा वक्तव्याची पाठराखण करणे अयोग्य असून कदम यांनीही मुंबई सोडावी, असेही त्या म्हणाल्या. अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणावरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडलीय. दोन दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्यासारखी वाटत असल्याचं ट्विट केलं होतं. तसेच बरेच लोक आपल्याला मुंबईमध्ये परत न येण्याची धमकी देत असून मी मुंबईत येत आहे हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे ट्विट केले होते. तिच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक शहर शिवसेना पदाधिकार्यांच्यावतीने शालिमार परिसरातील शिवसेना कार्यालयाबाहेर अभिनेत्री कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पालघर - कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाले असून तिच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. पालघर येथील हुतात्मा चौक येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर शाई फेकत 'कंगना रणौतचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या.
काही दिवसांपूर्वी मुंबईत सुरक्षित वाटत नसून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण आलो की काय?, अशी टीका करणारे ट्वीट कंगनाने केले होते. तिच्या या वक्तव्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्याबाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. कंगना रणौतना मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी आपला गाशा गुंडाळावा, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले होते. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेकडून तिच्यावर टीका होत आहे. आता शिवसैनिक रस्त्यावर उतरून कंगनाचा निषेध करताना दिसून येत आहेत. तर कंगनाने मुंबई पोलिसांची व जनतेची माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
परभणी - बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महाराष्ट्र तथा मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा परभणीत युवासेनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादंगात आता कंगनाने नवीन वक्तव्य केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र, तिच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना आता रंगताना दिसत आहे. कंगना रणौत हिने महाराष्ट्रात राहून मुंबई पोलीस व मराठीबद्दल केलेल्या वक्तव्याच्या ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. त्यानुसार कंगनाच्या निषेधार्थ परभणी येथे देखील जिल्हा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने केली. यावेळी मुंबईद्वेष्ट्या, मराठीद्वेष्ट्या व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंगना रणौतने मुंबई सोडून चालते व्हावे, या आशयाचा मजकूर असणारे बॅनर झळकवण्यात आले. तसेच घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने देखील करण्यात आली. या आंदोलनात युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी अर्जुन सामाले, गणेश मुळे, ओंकार शहाणे, दीपक राठोड, अजय शहाने, विशू डहाळे, विकी पाष्टे, राजेश बहिरट, गजानन शहाणे, अरुण झांबरे, धनंजय विश्वकर्मा, हनुमान रेंगे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक सहभागी झाले होते.
यवतमाळ : अभिनेत्री कंगना रानावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने यवतमळमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान दत्त चौकात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरीन कंगना रणौतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सुध्दा शिवसेनेच्या पदाधिका-यांनी यावेळी केला.
हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास न केल्याचा आरोप कंगनाने केला होता. आता तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सुध्दा कंगनाने वक्तव्य करणे सुरु केले आहे. राज्यात तसेच देशात अनेक महत्वाचे प्रश्न असतांना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे भाजपा राजकारण करीत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केली. यावेळी शिवसैनिकांकडून कंगनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
येवला (नाशिक) - मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेनेच्यावतीने कंगना राणौत विरोधात जोरदार निर्देशने करण्यात आली. कंगनाचे वक्तव्य म्हणजे मुंबईसह अखंड संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचा अवमान आहे. 26/11च्या हल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबाळें सारख्या हुतात्म्यांचा तर अपमान आहेच. परंतु कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जनतेसाठी झटणाऱ्या पोलिसांचा हा अवमान असून कंगना रणौत यांनी मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी येवला शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार,तालुका प्रमुख रतन बोरणारे,भास्कर कोंढरे,येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड ,शिवसेना नगरसेविका तथा महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोजनीताई वखारे,येवला नगरपालिकेचे शिवसेना गटनेते झामभाऊ जावळे, किशोर सोनवणे,शहर संघटक राहुल लोणारी,चंद्रमोहन मोरे,धिरज जावळे आदि उपस्थित होते.