मुंबई- गेल्या कित्येक वर्षांपासून राम मंदिर व बाबरी मस्जिद प्रकरण हा चर्चेचा विषय ठरला आहे. वादग्रस्त जागा नेमकी कुणाची, हा तिढा सोडविण्यासाठी न्यायालयाच्या फेऱ्या झाल्या. मात्र, योग्य निकाल लागत नसल्याने शवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले. आज, न्यायालय काय निकाल देईल, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. न्यायालयाने निकाल जाहीर केला असून वादग्रस्त जमिनीवर श्री रामांचे मंदिर बांधले जाईल, हा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर देशातील नेत्यांनी, माननीय लोकांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी - भारत हा लोकतांत्रिक व्यवस्था असलेला देश आहे. येथे न्यायालयाच्या निकालाचा प्रत्येकाने आदर करणे गरजेचे आहे, असे गडकरी म्हणाले. यावर अधिक टिप्पणी न करता गडकरी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
नवाब मलिक - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारावा. आता हा वाद संपुष्टात आला आहे. मात्र, कुणीही याबाबतचा आनंद व्यक्त करून कुणाच्या भावना दुखवू नयेत. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची भूमिका आम्ही आधीच घेतली आहे.
मा.गो. वैद्य -अयोध्या राम जन्मभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा समाधानकारक आहे. मी निर्णयाचा सन्मान करतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे. ती विवादित जागा आहे. त्या ठिकाणी राम मंदिर होते, असे देखील वैद्य यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुस्लीम बांधवसुद्धा समाधानी होतील. कारण, पाच एकर जागा मशिदीला दिली आहे, असे मत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.