मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नुकताच सावरकर जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 27 हजार 897 ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ५५ हजार ७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
414 अंगणवाड्या सामाजिक संस्थांना दत्तक - सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या एका सामंजस्य करार कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही सामाजिक संस्थांबरोबर अंगणवाड्या दत्तक देण्याचा कार्यक्रम केला. राज्यात सध्या एक लाख दहा हजार 446 अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक देण्याचे धोरण गेल्या वर्षापासून राबवले आहे. त्यानुसार राज्यातील अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून अंगणवाड्या सामाजिक संस्थांना दत्तक देण्यात येत आहेत. कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि काही विश्वस्त संस्थांना दत्तक जबाबदारी देण्यात येते. यासाठी व्यक्ती कुटुंब अथवा समूहाच्या माध्यमातून गुंतवणूक करता येऊ शकते. अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट व्हाव्यात आणि बालकांना योग्य सुविधा आणि आहार मिळावा यासाठी राज्य सरकारने ही अंगणवाडी दत्तक योजना राबवली आहे. आतापर्यंत राज्यात विविध 156 सामाजिक संस्थांनी 4861 अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.
चार संस्थांनी घेतल्या 414 अंगणवाड्या दत्तक - आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये चार विविध सामाजिक संस्थांनी 414 अंगणवाड्या दत्तक घेतले आहे. यामध्ये रायगड ठाणे पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. विपला फाउंडेशनने ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील 368 अंगणवाड्या ग्रामसेवा प्रतिष्ठानने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तीस अंगणवाड्या तर स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिकमधील दहा अंगणवाड्या कॉर्बेट फाउंडेशनने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील एकूण सोळा अंगणवाड्या त्यांच्या क्षमता वाढीसाठी दत्तक घेतले आहेत. अन्य सामाजिक संस्थांनी सुद्धापुढे येऊन अंगणवाड्या दत्तक घ्याव्यात असे आवाहन यावेळी लोढा यांनी केले.