मुंबई - मागील महिन्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) चार कोटी 98 लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला होता. तर यावेळी 93 पैकी 49 नमुने कमी दर्जाचे आढळले होते. यावरून मुंबई आणि ठाण्यात भेसळयुक्त खाद्यतेल विकत ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची बाब समोर आली होती. मात्र, या कारवाईनंतरही भेसळखोरांना वचक बसला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण आता पुन्हा मुंबई आणि ठाण्यातून एफडीएने 4 कोटी 60 लाख 26 हजार 219 रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. तर 40 नमुन्यापैकी 12 नमुने कमी दर्जाचे आढळले आहेत. त्यामुळे खाद्यतेलातील भेसळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
16 जानेवारीला एफडीएने मुंबई आणि ठाण्यातील तेल कंपन्यावर कारवाई करत 4 कोटी 98 लाखांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला होता. तर इतक्या मोठ्या संख्येने खाद्यतेलात भेसळ होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले. त्यामुळे एफडीएने खाद्यतेलावरील कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 10 फेब्रुवारीला मुंबई आणि ठाण्यात पुन्हा कारवाई केली आहे. गोवंडी, वसई, पालघर येथील खाद्यतेल विक्री करणाऱ्या कंपन्यावर छापा टाकला. यावेळी 1 कोटी 60 लाख 26 हजार 219 रुपयांचा तेलाचा साठा जप्त केला आहे.
हेही वाचा - मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपाबाबत मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावेत - तावडे
12 नमुने कमी दर्जाचे -
जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचे 40 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला असून यातील 28 नमुने प्रमाणित आढळले आहेत. तर 12 नमुने कमी दर्जाचे आढळले आहेत. म्हणजेच 12 नमुने भेसळयुक्त आढळले आहेत. ही बाब नक्कीच गंभीर असुन या भेसळखोरीला आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती शशिकांत केकरे (सहआयुक्त, बृहन्मुंबई एफडीए) यांनी दिली आहे. तर ग्राहकांनी खाद्यतेल खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.