मुंबई: शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याची कबुली दिली. आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारले असता, शिंदे गटातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. मी यापूर्वी सांगितले आहे. प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. हे गद्दार आहेत. राज्यातील जनतेसाठी काय केले हे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या की, भाजप आणि शिंदे गटाकडून जाती जातीत, धर्माधर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न होईल. राज्यातील जनतेने याकडे लक्ष देऊ नये. महाराष्ट्र म्हणून आपण सध्या अंधारात जात आहोत. कृषी केंद्र आणि उद्योग क्षेत्र कोलमडले आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच, गुलाबराव पाटील यांच्या पाईपलाईनचे विषय आमच्याकडे आले असेल. त्याविषयी अधिवेशनात मी आवाज उठवणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आता महाविकास आघाडीच: राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ४० आमदार अपात्र होतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच पोट निवडणूक लागेल किंवा मध्यवर्ती निवडणूक लागतील, असे ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
म्हणून गद्दारी केली: एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. हो एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला, अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. गुलाबराव पाटील आज मुख्यमंत्री यांच्या बाजूला बसतात. तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे, असे पाटील म्हणाले. तसेच आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. आम्ही वेडा आहोत का? तुम्ही शरद पवार काय करताय, एकनाथ शिंदे कोण आहेत? एक एक मराठा चेहरा असून त्याला मुख्यमंत्री केला. त्यासाठीच गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले.
निवडणूक प्रचारात शिंदेंवर टीकास्त्र: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहे की गुजरातचे, असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी 23 फेब्रुवारी, 20223 रोजी उपस्थित केला होता. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील नाना पेठ येथील साखळीपीर येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री गुजरातचे की महाराष्ट्राचे? महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण राज्यात साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक या राज्यात आणली. पण जेव्हा पासून राज्यात गद्दारांची सरकार आली आहे. तेव्हा त्यांनी राज्यातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पाठवले आहे. मला कधी कधी हाच प्रश्न येतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहे की गुजरात चे मुख्यमंत्री आहे. पण ते मला सांगतात की आदित्य असे बोलू नको मी महाराष्ट्राचे ही मुख्यमंत्री नाही, गुजरातचे ही मुख्यमंत्री नाही. मला दिल्लीवाले बोलणार मी तिथे जाणार, अशी जोरदार टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली होती.
एक सीएम आहे तर, दुसरे सुपर सीएम: कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील नाना पेठ येथील साखळीपीर येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सुनील केदार यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या सरकारमध्ये एक सीएम आहे तर, दुसरे सुपर सीएम आहे. कधी हे सही करत नाही तर कधी ते सही करत नाही. मरण आमच्या चाळीस आमदारांचे झाले आहे. तिकडे गेले, त्यांना वाटलं मंत्री होऊ, लाल दिवा घेऊन फिरू, असे वाटले होते.