मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. आता रेसकोर्स आणि वरळी डेअरी जागेवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला ( Aditya Thackeray Attack On Eknath Shinde ) लक्ष्य केले. मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा खोके सरकारचा डाव असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरुन ( Mumbai Mahalaxmi Race Course ) आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर सरकारमधून टीका होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स जागेवरुन वाद दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स ( Mumbai Mahalaxmi Race Course Land Dispute ) दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून आता या भूखंडावर थीमपार्क उभारण्याबाबत विचार सुरू आहे. तर महालक्ष्मीऐवजी रेसकोर्स आता मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे या जागेच्या वादावरुन आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे अविभाज्य ठिकाण महालक्ष्मी रेसकोर्स हे मुंबईचे अविभाज्य मोकळे ठिकाण आहे. प्रत्येक मुंबईकराच्या जीवनाचे ते भाग आहे. रेसकोर्सवर उद्धव ठाकरे यांनी द हायड पार्क सारखे उद्यान प्रस्तावित केले होते. प्रत्येकाला कोणत्याही बांधकामाशिवाय, हिरव्या मोकळ्या जागेत विनामूल्य प्रवेश असणार आहे. मुळात रेसकोर्सलाही मोठा वारसा आहे. लहान मुले, वृद्ध, धावपटू, योग प्रेमी, संगीत प्रेमी, कलाकार आणि पाळीव प्राणी आणि घोडे प्रेमींसाठी खुले शहरी हिरवेगार जागा तयार करण्याची कल्पना होती. सर्वांसाठी विनामूल्य खुले शहरी ग्रीन पार्क येथे होणार होते.
काँक्रिटचे व्यावसायिक जंगल करण्याचा डाव खोके सरकारच्या बिल्डर समर्थक धोरणांमुळे काँक्रिटचे व्यावसायिक जंगल करण्याचा डाव आहे. परंतु, प्रत्येकासाठी शहरी ग्रीन पार्क हवे आहे. करदात्याच्या खर्चाने मुलुंडच्या प्रस्तावित रेसकोर्समध्ये व्यावसायिक हितसंबंध गुंतले आहेत. तसेच वरळी डेअरी बिल्डरांना आणि रेसकोर्सची जमीन खोक्यांच्या व्यावसायिक हितासाठी विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. खोके सरकारच्या या मानसुब्याना प्रखर विरोध झालाच पाहिजे. कारण, खोके सरकार मुंबईकरांच्या नव्हे तर बिल्डर्स, व्यावसायिकांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. खोके सरकार मुंबई शहरातील प्रत्येक चौरस फूट विकायला प्रयत्न करत आहे. आम्ही या प्रत्येक इंचासाठी लढा देऊ, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.