मुंबई- भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात तातडीने कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आज विधानपरिषदेत महिला सदस्यांनी केली. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच्या आज मेहता यांच्या विरोधात तक्रार नोंदवून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मेहता यांच्या विरोधात त्यांच्याच सहकारी कार्यकर्ता महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
हेही वाचा- थेट सरपंच निवड पद्धत रद्द करणारे विधेयक मंजूर; विरोधकांच्या गदारोळातच शिक्कामोर्तब
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतच्या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेवेळी शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मेहता विरोधात गुन्हा कधी नोंदवला जाणार आहे, अशी विचारणा त्यांनी केली. शिवाय माजी आमदार म्हणून त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधाही बंद करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याच बरोबर मेहता यांच्या विरोधात गुन्हा नोंदवताना टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करणार का? अशी विचारणा त्यांनी सभागृहात केली.
त्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच्या आजच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, यावेळी विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी एक धक्कादायक माहिती सभागृहाला दिली. मेहता यांच्या विरोधात त्याच महिलेने 2019 आणि त्या पूर्वीही तक्रार दिली होती. शिवाय तिने पक्षांच्या वरिष्ठांनाही त्याची माहिती दिली होती. त्या तक्रारीचे काय झाले? याची चौकशी करण्याचीही सूचना त्यांनी दिली आहे.