मुंबई - वरळी येथील नाईट क्लब, बारकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ तपासण्यात येत असून दोषी असल्यास वरळीतील नाईट क्लब, बार, पबवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. दोषी आढळणाऱ्या बार, पबला सील लावून परवाने रद्द केले जातील, असेही ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश आहेत. मात्र, वरळी कमला मिल येथील नाईट क्लब, बार आणि पबमध्ये रात्रीच्या सुमारास गर्दी होत आहे. नुकतेच येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना नियमदेखील पायदळी तुडवण्यात आले. या गंभीर प्रकरणाची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख घेतली. त्यांनी नियम मोडणाऱ्या पब आणि बारवर कारवाईची घोषणा केली आहे. त्यामुळे बार, पब आणि नाईट क्लब मालकांचे धाबे दणाणले आहेत.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या प्रतिंबधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू
अस्लम शेख यांचे कारवाईचे निर्देश -
पब असु द्या किंवा रेस्टॉरंट किंवा लोक असतील ज्यांनी मास्क नाही तर कारवाई करण्यात आली आहे. काही पबच्या व्हिडिओ तपासून पाहिल्यावर त्यात दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. प्राथमिक कारवाई झाली आणि ते रेस्टॉरंट किंवा पब व्यवस्थापन ऐकत नसतील तर सील करून परवाना रद्द केला जाईल, असंही ते म्हणाले.