मुंबई - वादात अडकलेल्या 'तांडव' वेब मालिकेप्रकरणी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम 153 (अ) 295 (अ) आणि 505 नुसार निर्माता, दिग्दर्शक आणि इतर कलाकारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 'एफआयआर'मध्ये सैफ अली खानचेही नाव आहे. दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना 3 आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, 'तांडव' वेब मालिकेप्रकरणी आमच्याकडे तक्रार आलेली असून नियमानुसार या संदर्भात कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब मालिकांच्या बाबतीत केंद्र शासनाने कायदे व नियम बनवायला हवेत, असे गृहमंत्री देशमुख यांनी केंद्र सरकारला सुचवले.
ॲमेझॉन प्राईमची वेब मालिका तांडवमध्ये हिंदू भावनांना दुखावल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत बुधवारी सकाळी दाखल झालेले आहे. तांडव वेब मालिकेचा निर्माता दिग्दर्शक व चित्रपटाशी संबंधित काही कलाकारांची चौकशी यूपी पोलिसांच्या या पथकाकडून केली जाणार आहे.
याविषयी अनिल देखमुख म्हणाले की, 'संबंधित चौकशीसाठी त्यांनी आम्हाला याबद्दल अगोदरच सूचना दिलेली होती. महाराष्ट्र पोलिसांचे पथक जेव्हा त्यांच्या राज्यात चौकशीसाठी जाते, तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळते.'
सैफ अली खानच्या घराला पोलीस बंदोबस्त
देशभरात तांडव वेब मालिकेतील आक्षेपार्ह दृश्यांमुळे वाद निर्माण झाल्याने सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वांद्यातील घराला पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, करीना कपूर कारमधून घराबाहेर पडताना दिसली.
उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत
तांडव वेब मालिकेप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले असून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयांमध्ये या संदर्भात तपास करणार्या अधिकार्यांनी येऊन मुंबई पोलिसांची भेट घेतली होती. मुंबई पोलिसांकडून आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असून यासंदर्भात अद्याप कोणाचीही चौकशी आम्ही केलेली नाही. यासंदर्भात पुढील तपासात चौकशी केली जाईल, असे युपी पोलिसांच्या पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वेब मालिका निर्मात्यांचा माफीनामा
दरम्यान, तांडव वेब मालिकेमध्ये हिंदू धर्माविषयी भावना दुखविण्यात आल्यानंतर यासंदर्भात भाजप नेते राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा देत या संदर्भात पोलिसांनी कारवाई करावी म्हणून मागणी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल होण्याअगोदरच तांडव वेब मालिका बनविणाऱ्यांकडून यासंदर्भात बिनशर्त माफी मागण्यात आलेली आहे.
वाद नेमका काय?
अॅमेझॉन प्राइम या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तांडव ही नऊ भागांची वेब मालिका नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हिमांशू किशन मेहरा यांची निर्मिती आणि अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शन केलेले आहे. यामध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, झिशान अयूब, तिग्मांशू धुलिया, संध्या मृदूल, दीनो मोरिया, हितेन तेजवानी, अनुप सोनी इत्यादींच्या भूमिका आहेत.
मालिकेचा पहिल्या भागात झिशान अयूब शंकर बनलेले दाखवण्यात आले आहेत. त्यांना त्यांचा भक्त म्हणतो की, "तुम्ही आता डोळे उघडावेत भगवान, रामांचे फॉलोअर्स सध्या वाढताना दिसत आहेत. त्यावर झिशान यांचे पात्र उपहासाने काही वाक्ये बोलते." या मुख्य दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. हा हिंदू देव-देवतांचा अपमान असल्याचे आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - अभिनेत्री शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप
हेही वाचा - वीज ग्राहकांनो थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा होणार खंडीत, महावितरणाचे आवाहन