मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाशेजारील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तर याप्रकरणी उपायुक्तांवरही कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.
त्यासोबचत हा पूल लवकरात लवकर बांधण्याबाबत आयआयटी मुंबईकडून तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे. सहा महिन्यात हा पूल बांधण्यात येईल. तसेच मुंबईतील धोकादायक असलेल्या पूलांबाबत, ऑडिट करण्याबाबत नवीन मानके तयार करून याबाबाबत थर्ड पार्टी ऑडिट केले जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
याविषयी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मुंबईतील पूलांचे थर्ड पार्टी स्ट्रक्चलर ऑडिट करण्यात आले असल्याची माहिती दिली. दरम्यान, काँग्रेसचे भाई जगताप यांनी हिमालय पूल दूर्घटनेत ज्युनियर इंजिनिअरवर कारवाई करण्यात आली. मात्र, मोठे अधिकारी तसेच राहिले असल्याचे सांगत देसाईने केलेल्या पूलाचे ऑडिट अभियांत्यानी का तपासले नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे उपायुक्त आणि मुख्य अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची भाई जगताप यांनी मागणी केली.
यावर राज्यमंत्री योगेश सागर यांनी समिती नेमण्यात आली आहे. तर या अगोदरच मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपायुक्तांवर ही कारवाई केली जाईल, स्काय वॉकच्या संदर्भात एका महिन्यात कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.