मुंबई - अंधेरी येथील बॉम्बे केंब्रिज शाळेला मुंबई अग्निशमन दलाने नोटीस बजावली होती. या नोटीसचा कालावधी बाकी असतानाच अग्निशमन दलाकडून कारवाई करत पाणी आणि वीज कापल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या शाळेवर मुंबई अग्निशमन दलाकडून हेतुपरस्पर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला आहे. अशा प्रकारे शाळांवर कारवाई केली जात असल्यास त्या शाळेच्या बाजूला असलेल्या डी मार्ट आणि पंचतारांकित हॉटेलवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला आहे.
अंधेरी येथील बॉम्बे केंब्रिज शाळेमधील अग्निरोधक यंत्रणा योग्य प्रकारे नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. या नोटीसचा कालावधी ३० दिवसांचा होता. शाळेकडून चार ते पाच दिवसात अग्निरोधक यंत्रणा सुधारण्यात आली. तसे प्रमाणपत्र शाळेकडून अग्निशमन दलाकडे जमा करण्यात आले. मात्र त्याआधीच अग्निशमन दलाने पालिकेच्या आणि वीज कंपनीच्या साहाय्याने शाळेचे वीज आणि पाणी कापले आहे. या शाळेने मुंबई अग्निशमन दलाला दिलेली कागदपत्रे मी पाहिली आहेत. शाळेवर हेतुपुरस्पर कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सामंत यांनी सांगितले. याबाबत आपण स्थायी समितीत मुद्द्दा उचलला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
बॉम्बे केंब्रिज शाळेत अग्निरोधक यंत्रणा नसल्यामुळे किंवा ओसी नसल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्यास अशा मुंबईत १२०० शाळा आहेत. ज्यांच्याकडे ओसी नसताना चालवल्या जात आहेत. बॉम्बे केंब्रिज शाळेवर कारवाई करताना ती एप्रिल आणि मे महिन्यात सुट्टी असताना का केली नाही. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावरच कारवाई का केली गेली, असे प्रश्न सामंत यांनी उपस्थित केले आहेत.
या शाळेमध्ये २५०० विद्यार्थी शिकतात. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेचे लाईट पाणी कापण्यापेक्षा शाळेच्या ट्रस्टींवर कारवाई का केली नाही. या शाळेच्या बाजूलाच डी मार्ट आणि पंचतारांकित हॉटेलही ओसी नसताना चालू आहे. त्यांच्याकडेही अग्निरोधक यंत्रणा नाही. मग शाळेप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या कारवाईवर संशय निर्माण होत असल्याचे सामंत यांनी सांगितले.