मुंबई - येथील पार्कसाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांजूरमार्ग परिसरात रविवारी (दि. 22 डिसें) सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी मॉर्निंग वॉकसाठी एलबीएस मार्गावरील बाजीप्रभु देशपांडे मैदानावर गेली होती. त्यावेळी या मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. यात ती जखमी झाली असून त्या मुलीला काही रहिवाशांनी जवळील राजावाडी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन
पीडित मुलीचा मार्च, 2018 मध्ये शाळेतील शिक्षकांशी व काही कर्मचाऱ्यांसोबत काही वाद झाला होता. याबाबत तिने भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचाच राग मनात धरून हल्ला करण्यात आल्याची माहिती तक्रारीत पीडितेने दिली आहे.पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पार्कसाईट पोलिसांनी महिला मुख्याध्यापिका, एक शिक्षक आणि इतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामध्ये पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही.
हेही वाचा - 'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव'