मुंबई: शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कलम 406 आणि 420 अन्वये एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपीने भाडेतत्त्वावर 238 लॅपटॉप घेतले आणि ते परत केले नाही. त्याशिवाय आरोपी व्यक्ती फरार झाल्याने फसवणूक झालेल्या तक्रारदाराने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे कक्ष 5 करत असताना तब्बल सहा महिन्यानंतर आरोपीचा माग पोलिसांनी काढला आणी त्याला अटक केली आहे.
लॅपटॉपचा अपहार करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस दिल्लीतून अटक करण्यात यश मिळाले आहे. मनोज शामनारायण गौड (वय 39) असे या आरोपीचे नाव आहे. मनोज गौड याने शिवाजी पार्क येथील हिंद सर्विस इंडस्ट्रीज या कंपनीकडून 21 जून 2022 ते 17 ऑक्टोबर 2022 दरम्यान कंपनीचा विश्वास संपादन करत 238 लॅपटॉप भाडेतत्त्वावर घेतले. पण नंतर त्याचे भाडे न देता किंवा सदरचे लॅपटॉप परत न करता पळुन गेला. एकूण ८४ लाख २१ हजार ८९६ इतक्या किंमतीची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा गुन्हे शाखे मार्फत समांतर तपास चालू असताना अशी माहीती मिळाली की, आरोपीने अशा प्रकारे मुंबईतील बऱ्याच लोकांना सोशल मिडीयामार्फत संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केला व मोठया प्रमाणात त्यांच्या कडुन लॅपटॉप भाडेतत्वावर घेवून करोडो रूपयाची फसवणुक केली. तसेच त्याचे लॅपटॉप परत न करता पळुन गेला आहे. या गुन्हयातील आरोपीताच्या मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केला असता तो सतत सिमकार्ड आणि मोबाईल बदलत असल्याचे तसेच तो राहण्याचे पत्ते ही बदलून वेगवेगळ्या राज्यामध्ये लपत होता.
या आरोपीच्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा पोलीसांनी सातत्याने कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला असता आरोपी हा नवी दिल्ली येथे असल्याचे दिसुन आले.त्यावेळी पोलीस पथकाने नवी दिल्ली येथे गेले मात्र आरोपी सतत लोकेशन बदलत असल्याने सतत निगराणी ठेवुन आरोपीस न्यु हिरा पार्क, डीवाव चौक नजबगर, दिल्ली या परीसरातून ताब्यात घेतले. आरोपीने अशाच प्रकारचे अनेक ठिकाणी गुन्हे केले असुन त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा