मुंबई - राज्यात तिहेरी तलाक प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या पहिल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित आरोपी इम्तियाज पटेल यास तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणात संपूर्ण अहवाल न्यायालयात दाखल होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.
तिहेरी तलाक प्रकरणी केंद्रात विधेयक पारित झाल्यानंतर पहिला खटला हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात नोंदवण्यात आला होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदण्यात आला होता. ज्यामध्ये पीडित महिलेला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला होता. यासंदर्भात अटक होण्याच्या भीतीने आरोपीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्यासमोर झाली.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंब्र्यातील एका महिलेने 'मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीने व्हॉट्सअॅपवर 3 वेळा तलाक असे लिहून तिला गेल्या वर्षीच घटस्फोट दिला होता. त्यामुळे या महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नव्याने बनवण्यात आलेल्या तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.
या महिलेचे एमबीए झालेले असून, तिला 6 महिन्यांचा मुलगा आहे. पतीचे नाव इम्तियाज गुलाम पटेल असून तो 35 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी त्याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर तलाक दिला होता. तलाक दिल्यानंतर गेल्या वर्षीपासून तो दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीसोबतच सासू आणि नणंद यांच्याबद्दलही या महिलेने छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे.