मुंबई : नुकतेच लोकलमध्ये तरूणीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली होती. आता महिला अत्याचाराच्या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. नुकतेच एक नवीन अत्याचाराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव इंद्रजीत सिंह असे आहे. आरोपीने प्रथम महिलेला मारहाण केली. त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीही त्याने तरुणीला दिली.
अत्याचार करून धमकावले : इंद्रजित सिंह हा आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे अशी माहिती आरे पोलिसांनी दिली आहे. आरोपीने महिलेवर अत्याचार करून धमकावल्यानंतर भितीपोटी तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेची प्रसूती झाली होती. मात्र घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागल्याने या घटनेला वाचा फुटली. रक्तस्त्राव झाल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.
महिलेच्या शरीरावर काही जखमा : रुग्णालयात डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांना महिलेच्या शरीरावर काही जखमा दिसून आल्यानंतर संशय बळावला. त्यावेळी डॉक्टरांनी विश्वासात घेऊन महिलेला सर्व काही विचारले. त्यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेली दुर्दैवी घटना डॉक्टरांना आणि कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला मारहाण : आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ तपास सुरू केला. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून तिने घरी परतण्यासाठी नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळी नेली. तिथे त्याने आधी महिलेला मारहाण केली. त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. नराधम चालकाने महिलेला धमकावले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर आरोपी इंद्रजित थेट उत्तर प्रदेशात पळाला.
आरोपीला ठोकल्या बेड्या : आरे पोलिसांनी पीडितेकडून जबाब नोंदवून तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. सर्वप्रथम आरे पोलिसांनी रिक्षाच्या मालकाला गाठले. त्यानंतर घटनेत्या दुसऱ्या दिवशीच चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरे पोलिसांनी रिक्षा मालकाकडून आरोपीची सर्व माहिती घेऊन उत्तर प्रदेश गाठले. आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या. रविवारी आरोपीला अटक करुन उत्तर प्रदेशातून मुंबईत आणण्यात आले आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. आरे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात भारतीय दंड संविधान कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
- Nashik Crime News : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात; विवाहितेवर अत्याचार
- Raigad Crime : रायगडच्या महिलेवर साताऱ्यात सामूहिक अत्याचार, माजी आमदार विवेक पंडित यांनी घेतली दखल
- Sharad Pawar criticizes BJP : राज्यात महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले, पवारांचा घणाघात, मोदींनाही सुनावले खडे बोल