मुंबई : मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्नतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करू न दिल्याने विरोधकांनी आज सभात्याग केला. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण संताप व्यक्त केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित करू न दिल्याने काँग्रेसने आज सभागृहातून सभात्याग केला. मणिपूरमध्ये ४ मे रोजी ही घटना घडली होती. केंद्रातील गृह मंत्रालयाने या घटनेची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली. त्यावेळी देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर होते. तब्बल अडीच महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली, असे ते म्हणाले.
पंतप्रधान बोलायला तयार नाहीत : मणिपूरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, इंटरनेट सेवा सरु झाल्यानंतर व्हिडीओ बाहेर आला. सरकार परिस्थिती दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे संकेत देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन शब्द बोलले, अशी टीका चव्हाणा यांनी भाजपवर केली आहे. आज विधानसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित होऊ दिला नाही, म्हणून आम्ही सर्वजणांनी सभात्याग करीत सरकारचा निषेध केल्याचे चव्हाण म्हणाले.
मणिपूर प्रकरणावर राजकारण : मणिपूरमधील संवेदनशील मुद्द्यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मणिपूरमधील घटना चुकीचीच आहे. मात्र, विरोधक राजस्थानमधील घटनेबाबत का बोलत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. राजस्थानमधील एका कुटुंबाला जाळले गेले, काही महिलांवर बलात्कार झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? मणिपूरच्या बाबतीत जे बोलता आहेत ते राजस्थानच्या बाबतीत का बोलत नाहीत, अशी टीका राणे यांनी विरोधकांवर केली आहे. संवेदनशील मुद्द्यांवर राजकारण करण्याची गरज नाही, मणिपूरच्या प्रश्नावर भूमिका घेतलीच पाहिजे, तशीच राजस्थानबाबत विरोधक आमदार भूमिका घेतांना दिसत नाही? आपले ठेवायचे झाकून लोकांचे बघायचे वाकून, अशी काँग्रेची वृत्ती असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा- Aaditya Thackeray Vs Nitesh Rane : दोन तरुण आमदारांमध्ये वाकयुद्ध; कोण जाणार जेलमध्ये?