मुंबई - बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांची फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना पाठिंबा देणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. राज्यात मतभेद असले तरी चालतील मात्र, सीमा भागातील बांधवाना मदत करताना नसावेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप यांनी मराठी माणसांसाठी बेळगावला गेले पाहिजे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
मराठी प्रेमाचे ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही -
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही. फडणवीस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या उपस्थितीत विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष पाठिंब्याची गरज होती त्या वेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा देण्याचे आम्ही सर्वांना आवाहन केले होते. पण, फडणवीसांनी वेगळी भूमिका घेतली. हे महाराष्ट्रातील जनता लक्षात ठेवेल. आम्हाला मराठी प्रेमाचे कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही. बेळगावसाठी 1967मध्ये आंदोलन करून शिवसेनेने 67 हुतात्मे दिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्याच शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे, हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री फार सौम्य आहेत. ते माणुसकी आणि दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नासंदर्भात ते अस्वस्थ आहेत. लोकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. अजित पवार यांना चांगले माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनले, दुपारी कोसळले, त्यानंतर पुन्हा ते बनले या ऑपरेशनचे सर्जन अजित पवारच आहेत, असेही राऊत म्हणाले.