मुंबई - आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील भारताच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ)ने दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची देशांतर्गत मागणी अत्यंत कमी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
रत्ने व दागदागिने, वस्त्रे, पादत्राणे, हस्तकला अशा रोजगाराच्या क्षेत्रातील कमी मागणी अजूनही एक आव्हान आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत दहा टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, असे एफआयईओच्या अहवालात म्हटले आहे. निर्यात वसुलीची तूट भरण्यासाठी प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय व निदान उपकरणे, तांत्रिक वस्तू, वस्त्रे, कृषी व प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ, प्लास्टिक, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स हे उद्योग महत्वाचे ठरणार आहे.
मात्र, चीन विरोधी भावना असलेल्या देशांकडून भारतीय निर्यातदारांना मागणी वाढत आहे. यापैकी बर्याच मागण्यांचे ऑर्डरमध्ये रूपांतरही होत आहे, असे निर्यातकर्त्यांच्या समितीने नमूद केले.