मुंबई - तब्बल 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे खात्यातील काढण्यात आलेल्या टेंडर संदर्भात चौकशी सुरू होती. मात्र तब्बल ९ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठलाही पुरावा न मिळाल्यामुळे ही नऊ प्रकरणं बंद करण्यात आल्याचं एसीबीकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. 9 प्रकरणात चौकशी जरी बंद झाली असली तरी या प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट मिळालेली नाही, असंही एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये उघड चौकशी करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या 9 प्रकरणाच्या संदर्भात एसीबी कडून उघड चौकशी करण्यात येत होती. मात्र यासंदर्भात कुठलेही पुरावे न मिळाल्यामुळे या प्रकरणी 9 प्रकरणातील तपास बंद करण्यात आले असून तसा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात येणार आहे.
सिंचन घोटाळा प्रकरणी तीन हजाराहून अधिक टेंडर काढण्यात आले होते ज्यात बऱ्याच प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात येत आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये पुरावे मिळत नसल्यामुळे तशा प्रकारचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला द्यावा लागत असल्यामुळे वरील कारवाई करण्यात आलेली आहे.